Ad will apear here
Next
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ!
गोकुळाष्टमी उत्सवातील खंडित परंपरेचे पुनरुज्जीवन


रत्नागिरी :
ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे
टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया...

कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे सूर, चढत जाणाऱ्या रात्रीसोबत घडीघडीने वाढत जाणारा आबालवृद्धांचा उत्साह... 

.... या गावातील गोकुळाष्टमी उत्सव २००हून अधिक वर्षांपासून सुरू आहे; मात्र या उत्सवातील टिपऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण खेळांची परंपरा काही कारणाने सुमारे ५० वर्षांपूर्वी बंद पडली होती. ही खंडित परंपरा यंदापासून पुन्हा सुरू करून गावकऱ्यांनी आपल्या उत्सवाचे गतवैभव प्राप्त केले आहे; त्यामुळेच यंदाच्या उत्सवात या गावकऱ्यांचा आनंद आणि उत्साह दुधात साखर पडल्याप्रमाणे वाढला आहे. 



कोकणी माणूस मुळात उत्सवप्रिय. त्यामुळे कोकणातील गावागावांतील मंदिरांत त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परंपरांनुसार जवळपास प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता उत्सव चालूच असतो. गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे कोकणातील खास उत्सव असल्याची ख्याती सर्वत्र पसरलेली आहेच; पण त्याशिवाय अगदी रामनवमी, हनुमानजयंतीपासून महाशिवरात्री, गोकुळाष्टमीपर्यंतचे अनेक उत्सव गावागावांत साजरे होतात. प्रत्येक ठिकाणचा उत्सव सुरू होण्यामागे काही कारणे आहेत आणि सुरू झालेली उत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे त्याच उत्साहाने जपणे ही कोकणी माणसांची खासियत आहे. खंडित झालेली टिपऱ्यांची परंपरा या गावाने पुन्हा सुरू करणे, हे त्याचेच एक उदाहरण.

कुर्धे हे स्वामी स्वरूपानंदांच्या पावसजवळचे गाव. श्री महाविष्णू आणि श्री सर्वेश्वर ही विष्णू आणि शंकराची जुनी मंदिरे या गावात एकमेकांच्या शेजारी वसलेली आहेत. फार पूर्वीच्या काळी महाविष्णुचे मंदिर फडके घराण्याचे, तर सर्वेश्वराचे मंदिर चक्रदेव घराण्याचे खासगी देवस्थान होते. नंतरच्या काळात ती मंदिरे खासगी न राहता संपूर्ण गावाची झाली. त्यांचा ट्रस्टही झाला. ही मंदिरे सुमारे तीनशे वर्षे जुनी आहेत. या मंदिरांमध्ये ब्राह्मण कुटुंबांद्वारे महाशिवरात्री आणि गोकुळाष्टमीसह होणाऱ्या अन्य अनेक उत्सवांनाही कित्येक वर्षांची परंपरा आहे. गोकुळाष्टमी उत्सवात देवाच्या मूर्तीला लावल्या जाणाऱ्या मुखवट्यावर ‘शके १७०६’ असा उल्लेख आढळतो. सध्या शालिवाहन शक १९४१ सुरू आहे. म्हणजे हा उत्सव कमीत कमी २३५ वर्षे सुरू आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. 

श्री देव महाविष्णू

श्री देव महाविष्णू सर्वेश्वर उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश जनार्दन फडके यांनी या उत्सवाशी संबंधित गोष्टींची माहिती दिली. ‘या मंदिरांतील गोकुळाष्टमी उत्सव २००हून अधिक वर्षे सुरू आहे. हा उत्सव श्रावण कृष्ण प्रतिपदा ते नवमी या कालावधीत असतो. त्यापैकी सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी मुख्य उत्सव असतो. या उत्सवात विष्णुयाग किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन वगैरे गोष्टी असतात. शिवाय दररोज रात्री आरत्या, भोवत्या, भजनादी कार्यक्रमही असतात. हा उत्सव रोज रात्री साधारण नऊपासून मध्यरात्रीपर्यंत चालतो. पूर्वी या उत्सवात पारंपरिक टिपऱ्यांचा खेळ रंगत असे. आम्ही आमच्या लहानपणी हे खेळ पाहिलेले आठवतात. त्या टिपऱ्या गावातच तयार केल्या जात असत. त्यांची गाणीही पारंपरिक असत. साधारण ५० वर्षांपूर्वी टिपऱ्यांच्या खेळाची ही परंपरा खंडित झाली. नोकरी-व्यवसायानिमित्त गावातील मंडळी मुंबई किंवा अन्य शहरांत स्थलांतरित झाल्याने हळूहळू उत्सवाला येणाऱ्यांची आणि त्यातही हे टिपऱ्यांचे खेळ येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या कमी होत गेली. त्यामुळेच कदाचित ही परंपरा खंडित झाली असावी. भोवत्या (भजने म्हणून नृत्य करून प्रदक्षिणा घालण्याची पद्धत), कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रमांसह उत्सव मात्र सुरू होता. ही परंपरा पुन्हा सुरू करण्याबद्दल गेल्या काही कालावधीत चर्चा झाली आणि त्यानुसार गावकऱ्यांच्या इच्छेमुळे आणि त्यांनी आनंदाने घेतलेल्या सहभागामुळे यंदापासून ही परंपरा पुन्हा सुरू शकल्याचा मोठा आनंद आम्हाला आहे,’ असे फडके यांनी सांगितले. 

श्री देव सर्वेश्वर

‘ज्योत से ज्योत जगाते चलो...’
पावसजवळच्या गोळप गावातील हरिहरेश्वर मंदिरातील कार्तिकोत्सवाला १०० हून अधिक वर्षांची परंपरा असून, तेथे त्या उत्सवात टिपऱ्या खेळल्या जातात. त्यामुळे कुर्ध्यातील ग्रामस्थांनी गोळपमधील ग्रामस्थांना या टिपऱ्या शिकण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्या ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने शिकवण्याची तयारी दर्शवली आणि त्यानुसार सुमारे १२-१५ जणांची टीम शिकवण्यासाठी कुर्ध्यात आलीही. 

टिपऱ्यांची गाणी पारंपरिक असून, त्या गाण्यांवरच टिपऱ्यांचे सात-आठ प्रकार बेतलेले आहेत. गाण्यांतील बोलांमध्ये टिपऱ्या खेळणाऱ्यांना मार्गदर्शनाच्या ‘टिप्स’ आहेत आणि कृष्णस्तुतीही आहे. टिपऱ्यांच्या खेळातील सुरुवातीचे तीन प्रकार कुर्ध्यातील ग्रामस्थांना शिकवण्यात आले. त्यानंतर जवळपास १५ दिवस या सर्वांनी दररोज ठरवून वेळ काढून टिपऱ्यांचा सराव केला. खेळ योग्य पद्धतीने खेळले जाताहेत की नाही, हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा गोळपच्या ग्रामस्थांना बोलावण्यात आले. हे कौशल्य कुर्धेकरांनी कमी कालावधीत चांगल्या पद्धतीने आत्मसात केल्याची पावती त्यांनी दिली आणि पुढचे आणखी दोन प्रकार त्यांना शिकविले. त्यांचाही सुमारे १५ दिवस सराव करण्यात आला. 

पालखी

अशा पद्धतीने कुर्धे गावातील किमान १५ जोड्या टिपऱ्यांची परंपरा पुढे घेऊन जाण्यास तयार झाल्या. या जोड्यांमध्ये अगदी शाळकरी मुलांपासून पन्नाशी-साठीतील स्त्री-पुरुषांपर्यंतच्या सर्वांचाच समावेश आहे. तरुणांचा लक्षणीय आणि उत्साहपूर्ण सहभाग ही यातील विशेष उल्लेखनीय बाब. ही परंपरा पुढे चालवली जाण्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट.

या पद्धतीने टीम तयार झाल्यानंतर यंदाच्या उत्सवात कुर्ध्यात ५० वर्षांनी पुन्हा एकदा टिपऱ्यांचा आविष्कार झाला. टिपऱ्यांचे पाच प्रकारचे खेळ सर्वांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केले. सर्व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. पुढच्या वर्षी उर्वरित प्रकारही शिकणार असून, गोफ विणण्याचा खेळही शिकणार असल्याचे या सर्वांनी सांगितले. 

काही वर्षांपूर्वी उत्सवाला येणाऱ्या महिलांची संख्या कमी असायची. भोवत्यांमध्ये महिलांचा सहभाग नव्हता हे त्याचे कारण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनाही सहभागी करून घ्यायला सुरुवात करण्यात आली. गेल्या काही वर्षांत भोवत्यांमध्ये आणि एकंदरच उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. काळानुसार उत्सवात आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता हीदेखील दखल घेण्यासारखी बाब आहे.

टिपऱ्या असोत, गोफ असो किंवा भोवत्या, हे खेळ शारीरिक क्षमता तर वाढवतातच; पण एकाग्रतेचाही कस पाहतात. सर्वांशी जुळवून घेण्याचा संस्कार देतात आणि त्यामुळे संघभावना वाढीस लावतात. गाण्यांच्या रूपाने जुन्या, अर्थपूर्ण साहित्याचा ठेवा जपला जातो. संगीतकलाही जोपासली जाते. या गावातून बाहेर स्थायिक झालेली मंडळी, गावच्या माहेरवाशिणी अशी सगळी मंडळी या उत्सवासाठी आवर्जून वेळ काढून येतात. त्यामुळे साहजिकच भेटीगाठी होतात नि ऋणानुबंध अधिक दृढ होतात.

जुन्या गोष्टी टाकून देण्याच्या सध्याच्या काळात चांगल्या, जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे. ‘चांगल्या कामासाठी एकत्र या आणि शक्ती वाढवा’ हे श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान अशा गोष्टींतूनच चांगल्या पद्धतीने रुजू शकते. 

(सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)



(रत्नागिरीतील पिरंदवणे गावातील गोकुळाष्टमी उत्सवाला १५९ वर्षांची परंपरा असून, या उत्सवात गोफ विणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळला जातो. त्याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZRNCD
Similar Posts
आदर्श गुरू आणि वारसा जपणारे शिष्य कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांनी निरपेक्ष भावनेनं केलेल्या वेदांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडविले. त्याशिवाय सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं कार्यही उल्लेखनीय होतं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूच्या स्मरणार्थ विशेष सोहळा आयोजित केला होता
पिरंदवणे गावातील पारंपरिक गोकुळाष्टमी उत्सव; वैशिष्ट्यपूर्ण गोफ आणि टिपऱ्या पिरंदवणे (ता. जि. रत्नागिरी) येथील सोमेश्वर मंदिरात होणाऱ्या गोकुळाष्टमी उत्सवाला १६० वर्षांची परंपरा आहे. गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांचं जतन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. यंदा अर्थातच करोनामुळे हा उत्सव होणार नाही. म्हणूनच या उत्सवाच्या आधीच्या स्मृती जागवणारा व्हिडिओ शेअर करत आहोत.
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव : पालखी नाचवणे, पालखीभेट (व्हिडिओ) कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा किती तरी अधिक. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language